Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
वनमजूर, तेंदूपत्ता कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात – सिद्धांत पुनेकर.
चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्याच दिवशी चंद्रपूर तालुक्यातील वरवट परिसरात आणखी एका महिलेवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या सलग घटनांमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जंगल परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.
तेंदूपत्ता संकलनासाठी जाणारे मजूर, वनमजूर, शेतकरी आणि आदिवासी महिला आजही जीव धोक्यात घालून जंगलात जात असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा उपाध्यक्ष सिद्धांत पुनेकर यांनी शासन व वन विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सिद्धांत पुनेकर म्हणाले की, “चंद्रपूर जिल्ह्यात जंगलालगत राहणारे आदिवासी, वनमजूर, तेंदूपत्ता कामगार आणि शेतकरी हे उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून मागील पाच वर्षांत २०० पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.”
“गुंजेवाहीतील चार महिलांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना आहे. मृत महिला या आपल्या कुटुंबाचा आधार होत्या. शासनाने केवळ घटनांनंतर मदत जाहीर करण्याची औपचारिकता न करता कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, वन विभागाने संवेदनशील गावांमध्ये विशेष सुरक्षा यंत्रणा उभारावी, जंगल परिसरात नियमित गस्त वाढवावी, अलर्ट सिस्टम सुरू करावी तसेच तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
तसेच मृतांच्या कुटुंबियांना किमान ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी शासनाने तातडीने सर्वसमावेशक कृती आराखडा जाहीर करावा, अन्यथा ग्रामीण भागातील नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता असल्याचेही सिद्धांत पुणेकर यांनी स्पष्ट केले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: